Swami Ramanand Teerth Sanshodhan Kendra, Latur

परमपूज्य बाबासाहेब परांजपे



परमपूज्य  बाबासाहेब परांजपे
            
              भारतीय स्वातंत्र्याची परिपूर्ती करणारा लढा म्हणजे हैदराबाद मुक्तीसंग्राम. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संस्थानातील जनतेने अभूतपूर्व असा लढा दिला.या लढयातील  स्वामीजींचे मराठवाडयातील प्रमुख सहकारी म्हणजे परमपूज्य बाबासाहेब परांजपे. आपल्या अमोघ वक्तृत्वाने ज्यांनी मराठवाडयातील हजारो तरुणांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेतले.स्वामीजी प्रमाणेच बाबासाहेबांचा ही या निजामी संस्थानाशी काहीही संबंध नव्हता पण नियतीनेच स्वामीजी प्रमाणे बाबासाहेबानांही या मुक्तिलढ्यात सहभागी करून घेतले.मराठवाडयातील तरुण पिढीवर बाबासाहेबांनी जवळजवळ तीन तपे देशभक्तीचे,राष्ट्रीयत्वाचे, लोकशाहीचे आणि समाजवादाचे संस्कार केले.हजारो कार्यकर्ते व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
               बाबासाहेब मुळचे पुण्याचे. बाबासाहेबांचे मूळ नाव रामचंद्र गोविंदराव परांजपे. पुणे येथे त्यांचा जन्म १ जुलै १९०७ रोजी झाला.त्यांचे वडील मोहोळला स्टेशन मास्तर होते.त्यांना तीन मुले विनायक, रामचंद्र व महादेव व एक मुलगी.रामचंद्र यांनाच पुढे हिप्परगा येथे आल्यानंतर बाबासाहेब या नावाने ओळखले जाऊ लागले. निवृतीनंतर गोविंदराव  सोलापूरला स्थायिक झाले.बाबासाहेबांनी आपले शालेय शिक्षण सोलापूरच्या ‘हरीभाई देवकरण हायस्कूल’मधून पूर्ण केले.सोलापूरचे तेव्हाचे वातावरण देशभक्तीच्या भावनांनी ओतप्रोत भारलेले होते.बाबासाहेबांसारखा भावनाप्रधान युवक त्यातून सुटणे शक्य नव्हते.खरतर पुढे शिकण्याऐवजी देशासाठी काहीतरी करावे असे त्यांना वाटत होते पण वडिलांच्या आग्रहामुळे  पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून ते बी. एस्सी.झाले. बाबासाहेबांचे वडील बंधू विनायकराव व स्वामीजी हे मित्र होते. स्वामीजी हिप्परगा या ठिकाणी असलेल्या राष्ट्रीय शाळेत निघाले होते. स्वामीजीसोबत  बाबासाहेब पण या शाळेत १९२९ ला रुजू झाले.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये १९०६ साली राष्ट्रीय शिक्षणाची कल्पना मांडण्यात आली.त्यानंतर देशात अनेक ठिकाणी राष्ट्रीय शिक्षणाचे प्रयोग झाले.निजामी राजवटीत तर दुहेरी पारतंत्र्य होते.मातृभाषेत शिक्षण घेण्याच्या सुविधा तर नव्हत्याच पण परवानगी पण दिली जात नसे.अशा काळात हिप्परगा या गावात राष्ट्रीय शिक्षणाचा एक प्रयोग झाला. व्यंकटराव माधवराव देशमुख व अनंतराव गोविंदराव कुलकर्णी यांनी उस्मानाबाद जिल्हयातील हिप्परगा या अगदी आडवळणाच्या गावी (ता.लोहारा तत्कालीन ता.तुळजापूर) येथे १९२१ ला राष्ट्रीय शाळा स्थापन केली. शिक्षणाच्या माध्यमातून उगवत्या पिढीवर देशभक्तीचे संस्कार करावेत हा या विद्यालयाचा मुख्य उद्देश होता. (व्यंकटराव व अनंतराव हे दोघे सख्खे भाऊ होते.पण पुढे अनंतराव  दत्तक गेल्यामुळे त्यांचे आडनाव कुलकर्णी झाले.)  अत्यंत बुद्धिमान असलेले व्यंकटराव व्यवसायाने वकील होते.ते लोहारा येथे वकिली करीत.ते लोकमान्य टिळकांचे भक्त होते त्यामुळेच पुढे ते स्वातंत्र्य लढ्याकडे आकर्षिले जाणे साहजिक होते.ब्रिटीश भारतापेक्षा हैदराबाद संस्थानातील परिस्थिती वेगळी होती. अशा प्रतिकूल परिस्थिती मध्ये या दोन बंधुनी १९२१ मध्ये हिप्परगा या छोट्याशा गावी राष्ट्रीय शाळा स्थापन केली. व्यंकटराव व अनंतराव या दोघांनी वेळ प्रसंगी आपले सर्वस्व या शाळेसाठी समर्पित करून शाळा चालवली. हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ या शाळेत १९२९साली आले व त्यांनी सोबत बाबासाहेबानाही आणले.  स्वामीजी   जवळपास सहा वर्ष या शाळेत मुख्याध्यापक  म्हणून कार्य करत होते.तर बाबासाहेब विज्ञान विषय शिकवीत.येथेच स्वामीजींनी १४ जानेवारी १९३२ रोजी  संन्यास घेतला.तेव्हापासून त्यांचे नाव स्वामी रामानंद तीर्थ असे झाले. (अर्थात स्वामीजी शाळेच्या स्थापनेनंतर जवळपास आठ वर्षांनी या शाळेत आले होते.आणि या संस्थेच्या संस्थापकांपैकी ते नव्हते हे लक्षात घ्यावे लागेल) अनेक चांगले शिक्षक या शाळेला लाभले यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ. बाबासाहेब परांजपे,एस आर देशपांडे,आचार्य गणेश धोंडो देशपांडे, राघवेंद्रराव दिवाण, ह.रा.महाजनी, राळेरासकर, भावे गुरुजी, श्री दाते, श्री पाठक असे अनेक तपस्वी शिक्षक या शाळेला लाभले. विद्यार्थी संख्या २१० पर्यंत पोहोचली होती. “या संस्थेचे कार्य म्हणजे हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाचा श्री गणेशाच होय.” असे उदगार मा.यशवंतराव चव्हाण यांनी काढले होते. येथे सर्वांच्या साठी निवारा म्हणून कुडाच्या झोपड्या बांधल्या होत्या. मुले व अध्यापक एकत्रच राहत. या शाळेत खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे व्यक्तीमत्व फुलून आले. धार्मिक व इतर ग्रंथाचे विपुल वाचन झाले. बाबासाहेब खालच्या वर्गाना विज्ञान शिकवीत तर दहावीला गणित हा विषय खूप आत्मीयतेने शिकवत.अत्यंत साधी राहणी व अभ्यासू वृत्तीमुळे ते विद्यार्थ्यात  विशेष प्रिय होते.
पुढे  स्वामीजी व बाबासाहेबांनी अंबाजोगाईला योगेश्वरी विद्यालयास नावारूपाला आणले व ती हैदराबाद संस्थानातील पहिल्या क्रमांकाची शाळा बनली. ध्येयवादी व देशभक्तीने भारावलेले शिक्षक या ठिकाणी एकत्र करण्यात हे दोघे यशस्वी झाले. येथे अध्यापकांची एक नवीच परंपरा सुरु केली.   शिक्षक विद्यार्थ्यासह जोगाई हॉलमध्ये राहत, सुरुवातीला तर स्वामीजी गावात माधुकरी मागून शिक्षक व परगावच्या विद्यार्थांची उपजीविका भागवत.पुढे विद्यार्थी संख्या वाढत गेली तशी वसतिगृहाची कल्पना पुढे आली. बाबासाहेबांनी या काळात गावोगाव जाऊन पालकांच्या भेटी घेतल्या व पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले तसेच वसतिगृहासाठी नगदी व धान्य रूपाने मदत मागितली. बाबासाहेबांचे ओजस्वी विचार ऐकून मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाला. बाबासाहेब मराठवाडयात शिक्षक म्हणून आले. स्वामीजी व बाबासाहेबांनी खऱ्या अर्थाने या भागात शैक्षणिक क्रांती घडवून आणली. १९४२च्या चले जाव आंदोलनाच्या वेळी निजामाने हैदराबाद संस्थानातही कॉंग्रेस नेत्यांना अटक केली .
            १० ऑगस्ट १९४२ रोजी बाबासाहेब मुलांशी बोलत बसले होते. तितक्यात पोलीस आले व त्यांनी बाबासाहेबांना अटक केल्याचे सांगितले. त्यांना एक तास वेळ दिला.घरून कपडे व इतर आवश्यक साहित्य आणण्यास सांगितले.बाबासाहेब म्हणाले लगेच निघू.माझ्याकडे काही सामान नाही .पोलिस अधिकाऱ्यांना आश्चर्य वाटले.मुलांनी त्यांचे धोतर ,शर्ट ,टोपी आणून दिली. बाबासाहेब निर्भय होते त्यांना हैदराबाद मधील चंचलगुडा तुरुंगात स्थानबद्ध केले गेले तिथे ते १९४४ पर्यंत होते. बाबासाहेबांचे वाचन अफाट होते ,बंदिवासाचा वापरही त्यांनी इतर कैद्यांचे वैचारिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी केला.तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर बाबासाहेबांनी मुक्ती लढ्याच्या व्यापक क्षेत्रात पदार्पण केले. त्यावेळी हैदराबाद स्टेट कॉंग्रेसवर बंदी होती पण मराठवाड्यात महाराष्ट्र परिषदेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी फार मोठया प्रमाणात जन जागृती करण्याचे कार्य केले ज्यावेळी कासिम रझवीच्या नेतृत्वाखाली रझाकार संघटनेने मोठया प्रमाणात अन्याय, अत्याचारास सुरुवात केली त्यावेळी फार मोठया प्रमाणता स्थलांतर होऊ लागले,  मुळात बाबासाहेब गांधीवादी पण रझाकारांना तोंड देण्यासाठी त्यांनी सशस्त्र लढ्याचा स्विकार केला .बाबासाहेबांनी पुण्याला जाऊन शिरुभाऊ लिमये यांच्याकडून मार्गदर्शन घेतले ,पुणे व सोलापूरच्या विश्वासू तरुणांच्या मदतीने हातबॉम्ब तयार केले यावेळी नागनाथ परांजपे यांनी त्यांना सर्व मदत केली.सरहदीवरील सर्व कॅम्पना सर्व हत्यारांची मदत करण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांचे हैदराबाद मुक्तीलढयातील योगदान अत्यंत महत्वाचे आहे. पुढे बाबासाहेबांनी सिंधुताईशी आंतरजातीय विवाह केला. खासदार झाल्यानंतर त्यांनी शिक्षण क्षेत्र व रचनात्मक कार्याला वाहून घेतले.बाबासाहेबांनी मुरुड येथे शिवाजीराव नाडे व त्यांचे तरुण सहकारी यांच्या मदतीने  सघन क्षेत्र योजना सुरु केली. प्रत्येक खेडे स्वयंपूर्ण झाले पाहिजे यासाठी योजना आखली जनता विद्या मंदिराच्या माध्यमातून शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. शाळा हे समाज परिवर्तनाचे केंद्र बनले पाहिजे असा बाबासाहेबांचा आग्रह होता. बाबासाहेबांनी प्रयत्नपूर्वक लातूरला तंत्रनिकेतन सुरु केले. हैदराबाद मुक्तीसंग्रामास भरीव आर्थिक मदत देणारे श्री पुरणमलजी लाहोटी यांचे नाव त्यास देण्यात आले. प्रसिध्द उद्योजक कै.गुरुशांत अप्पा लातुरे म्हणत,   “परमपूज्य बाबासाहेबांमुळे आम्ही अभियंता झालो. आपल्या भागात  बाबासाहेबांनी केलेल्या कामाचा कधीही विसर पडता कामा नये.”
            १९८० नंतर बाबासाहेब लातूरला राहायला आले. लातुरवर त्यांचे फार प्रेम. लातूरकरांनाही बाबासाहेबाबद्दल  खूप आदर होता. गोरगरिबांच्या मदतीचे, समाज प्रबोधनाचे त्यांचे कार्य चालूच होते. १९८२ ला लातूरकरांनी श्री नारायणलालजी लाहोटी यांच्या पुढाकाराने भव्य असा अमृत महोत्सवी कार्यक्रम साजरा केला.यावेळी पी.व्ही.नरसिंहराव. शिवराज पाटील चाकूरकर, तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले, पू.गोविंदभाई श्रॉफ, अनंतराव भालेराव, श्री विलासराव देशमुख उपस्थित होते. यावेळी बाबासाहेबांनी सार्वजनिक पैशाचा अपहार हे मोठे पाप आहे असे सांगितले होते. पुढे २६ एप्रिल १९९१ ला बाबासाहेबांचे निधन झाले.पुढे १९९३ ला श्रीमती सिंधूताई, गुरुशांत अप्पा लातुरे व मनोहर आल्टे यांच्या प्रयत्नातून बाबासाहेब परांजपे फाउंडेशनची स्थापना झाली.२०१८ साली या   फाउंडेशनला २५ वर्ष पूर्ण झाली असून हैदराबाद मुक्तीसंग्रामातील सर्व स्वतंत्रता सेनानीच्या कार्याची स्मृती जपण्याचे, लोकप्रबोधनाचे कार्य आजही फाउंडेशनच्या माध्यमातून अविरतपणे चालू आहे ....परमपूज्य बाबासाहेबांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन .....

                                                                               भाऊसाहेब शिवाजीराव उमाटे,लातूर
                                                                                      ७५८८८७५६९९
                                                                        www.bhausahebumate.com
                
                

No comments

Theme images by luoman. Powered by Blogger.