Swami Ramanand Teerth Sanshodhan Kendra, Latur

हैदराबाद संस्थानातील पहिले बलिदान - हुतात्मा वेदप्रकाश




         हैदराबाद संस्थानातील पहिले बलिदान -                             हुतात्मा वेदप्रकाश


हैदराबाद संस्थानात आर्य समाजाचे कार्य जरी १८८२ सालापासून सुरु झाले असले तरी १९३४ पासून या भागात आर्य समाजाचा प्रभाव वाढला होता.आर्य समाजाचे प्राबल्य प्रामुख्याने उस्मानाबाद,नांदेड,बिदर व गुलबर्गा या जिल्ह्यांत होते.आर्य समाजाची वाढ आणि तिची प्रत्येक पायरी संघर्षाचीच द्योतक ठरली. आर्य समाजाने मुस्लीम धर्मप्रसार व धर्मांतर (तबलीग ) यांना प्राणपणाने विरोध केला. हिंदू संघटन करणाऱ्या आर्य समाजावर निजामाचा रोष होता त्यामुळे  आर्य समाजाची स्थापना ,आर्य मंदिर, हवनकुंड, आर्य कीर्तन इ.  प्रतिकारातूनच करावी लागली पण आर्य समाजामुळे  मुस्लीम धर्मांतर मोहिमेस आळा बसला.एकीकडे निजाम सरकार व मुस्लीम धर्माध शक्ती वाढत्या अत्याचाराकडे वाटचाल करीत होत्या तर आर्य समाज अधिक परिणामकारक प्रतिकाराचे मार्ग शोधत होता. हैदराबाद संस्थानात इस्लाम धर्मीयांखेरीज कोणालाच विशेषता हिंदुना कसलेच धर्मस्वातंत्र नव्हते.आर्य समाजावर तर सरकारची वक्रदृष्टी होतीच.
इ.स.१९३७ मध्ये अनेक संताप जनक घटना घटल्या.  मुक्तीसंग्रामातील अनन्वित अत्याचाराचे सत्र गुंजोटी येथील आर्यसमाजाचे कार्यकर्ते वेदप्रकाश यांच्या हत्येपासून सुरु होते ,गुंजोटी येथील वेदप्रकाश यांचे मूळ नाव दासप्पा  शिवबसप्पा हरके असे होते.यांचा जन्म १९१७ चा.या वीर पुत्राने वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी दिलेले बलिदान पुढे चालून हैदराबाद संस्थानातील निजामाचे तख्त उखडून टाकण्यास कारणीभूत ठरले .
               इ.स.१९३६ -१९३७ या काळात या भागात अनेक गावात आर्य समाजाची स्थापना झाली होती.भाई बंशीलाल,भाई श्यामलाल ,पं.विरभद्रजी आर्य ,पं. कर्मवीरजी, आर्य उदयवीर, माधवराव घोणशीकर, पं.नरेंद्रजी  यांनी या भागात हिंदुना संघटीत करण्याचा प्रयत्न केला.वेदप्रकाश आर्य समाजाच्या कार्यात उत्साहाने सहभागी होत होते.यामुळे रझाकाराना  वेदप्रकाश डोळ्यात खुपत होते.
          २३ फेबुवारी १९३७ ला गुंजोटी येथे भाई बंशीलाल यांचे व्याख्यान आयोजित केले होते.भाषण ऐकण्यासाठी अनेक गावातील लोक आले होते.वेदप्रकाश पं.बंशीलाल यांना आणण्यासाठी उमरगा येथे गेले होते पण सायंकाळपर्यंत पं . बंशीलाल आले नाहीत त्यामुळे वेदप्रकाश निराश होऊन गावी परतले.परगावचे लोक वाट पाहून चार वाजल्यानंतर आपापल्या गावी परतले.गावातील मजलिसे  इत्तेहादुल मुसलमीनच्या गुंडांना आर्य समाजाच्या या कार्याचा रोष होता,त्या दिवशी आर्य समाजाचा कार्यक्रम उधळून लावण्यासाठी अनेक गावाहून   गुंड आले होते.आता ते घोषणा देत वेदप्रकाशच्या घराकडे आले. पं . बंशीलाल आले असावेत या कल्पनेने वेदप्रकाश उत्साहाने पळत सुटले.तितक्यात  गुंडांनी त्यांना घेरले.वास्तविक पाहता पिळदार शरीराचे वेदप्रकाश आपली तलवार न घेताच शत्रूच्या गराड्यात सापडले,वेदप्रकाश यांच्यासमोर असा पर्याय ठेवण्यात आला होता की त्यांनी एकतर इस्लाम धर्म स्विकारावा अथवा मृत्यू पत्करावा. अर्थातच धर्माभिमानी वेदप्रकाशने मृत्यू पत्करला. छोटेखान नावाच्या पठाणाने वेदप्रकाश यांच्यावर वार केला.  तलवारीच्या घावांनी वेदप्रकाश यांचे शरीर रक्ताने माखून निघाले.लढता लढता ते कोसळले.वेदप्रकाश  हुतात्मा झाले, हैदराबाद मुक्तीसंग्रामातील वेदप्रकाश हे  पहिले  हुतात्मा, ही बातमी सर्वदूर पोहचली,सर्वत्र हाहाकार माजला.हैदराबाद संस्थानातील जनआंदोलन तीव्र होण्यास ही घटना खऱ्या अर्थाने कारणीभूत ठरली.
नागदिव्याच्या सणाच्या आदल्या दिवशी वेदप्रकाश यांनी  बलिदान दिले.दुसऱ्या वर्षीच्या नागपंचमीला माहेरी आलेल्या मुली भूलईचा फेर धरून बंधू वेदप्रकाश यांच्या बलिदान गीत गाऊ लागल्या.
वेदप्रकाश प्रकाश मारियले ।
हे गं कळालं कळालं शहरात ।।
शिर आर्याचं,आर्याचं दारायात ।
शिर गवंडयाच्या, गवंडयाच्या दारायात ।।
भूईवर पडले रगताच्या थारोळ्यात ।
पयलाच वीर निजामी संस्थानात ।।
नाही कळालं कळालं  काहो देवा ।
द्रौपदी म्हणते हाती सुदर्शन घ्यावा ।।
हे गीत कवी शिवराज आर्य यांच्या आईने रचलेले असून आजही नागपंचमीला गुंजोटीमध्ये गायले जाते.
भाऊसाहेब शिवाजीराव उमाटे
                              सहशिक्षक , ज्ञानेश्वर  विद्यालय, शाहू चौक,लातूर  
                  (सदस्य , इतिहास अभ्यास मंडळ,बालभारती,पुणे,) मो.७५८८८७५६९९  

             

No comments

Theme images by luoman. Powered by Blogger.